Tuesday, December 23 2025 7:19 am
latest

न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी निवड महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 09 : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या झालेल्या ऐतिहासिक निवडीबाबत विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद घटना आहे.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, “विदर्भातील अमरावतीचे सुपुत्र असलेल्या गवई यांचे शिक्षण अमरावती आणि मुंबई येथे झाले. त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि समाजसेवक रामकृष्ण गवई यांचे ते सुपुत्र असून, त्यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याचे संस्कार लाभले आहेत.”

याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी विशेष उल्लेख केला की, दिवंगत नेते दादासाहेब गवई यांच्याकडून त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि वंचित घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा घेतली आहे. त्यांची सरन्यायाधीश पदावरील नियुक्ती ही सामाजिक समतेचा आणि न्यायाचा विजय आहे.