Thursday, February 5 2026 8:53 am

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा

ठाणे 02 : सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी टपाली मतदानाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबईसह ठाणे महानगरपालिका हद्दीत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची नावे ते वास्तव्यास असलेल्या मुंबई, डोंबिवली, कल्याण, बदलापूर नेरूळ, पनवेल अशा विविध ठिकाणच्या मतदार यादीत नोंदलेली आहेत. हे सर्व कर्मचारी मतदार असून सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांची निवडणूक कामी नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक कर्तव्यामुळे मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने टपाली मतदानाची व्यवस्था केली आहे.

सध्या राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच कालावधीत जाहीर झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे मतदान अन्य महानगरपालिका क्षेत्रात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा किंबहुना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी टपाली मतदानाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून या कामी उपायुक्त दिनेश तायडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक ड्युटीवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेच्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपला मतदानाचा हक्क वाया जाऊ देऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासाठी सर्व महानगरपालिकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक आदेशासोबत टपाली मतपत्रिका मिळविण्यासाठी आवश्यक नमुने उपलब्ध करून दिले आहेत.

संबंधित कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेसाठीचा नमुना भरून, त्यासोबत संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा तसेच निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती आदेशाची प्रत सादर केल्यास टपाली मतपत्रिका थेट त्यांच्या घरी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक ड्युटीमुळे मतदानापासून वंचित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता सहजपणे आपला मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे.