मुंबई, 16 : निरा-देवघर प्रकल्पाचे कालवा आणि उपसा सिंचन प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून, या प्रकल्पामुळे माळशिरस व फलटण सारख्या दुष्काळग्रस्त भागांना लवकरच सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत सांगितले.
सदस्य उत्तमराव जानकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी सदस्य समाधान अवताडे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
मंत्री विखे-पाटील म्हणाले, निरा देवघर प्रकल्पातून सुरू होणाऱ्या कालव्याचे पहिल्या ६५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. साधारणपणे बंदिस्त पाईपलाईन द्वारे १०० किलोमीटरचे काम करायचे असून त्यापैकी २० किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सुरू आहे.
१०० वर्षांपूर्वी बांधलेल्या निरा उजवा कालव्याची वहनक्षमता अपुरी ठरत असल्याने दोन सिंचन आवर्तनांमध्ये अंतर वाढले आहे. मात्र, २०२५ च्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या पिकांना धोका झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. निरा देवघर आणि गुंजवणी प्रकल्पाचे कालवे कार्यान्वित होईपर्यंत त्यांच्या पाण्याचा लाभ निरा उजवा आणि डाव्या कालव्याला मिळत आहे. त्यामुळे निरा देवघरचे पाणी थांबले तरी मूळ लाभक्षेत्रावर फारसा परिणाम होणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
