Thursday, March 5 2026 2:11 pm

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई उपनगर,11 : राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. लोकशाहीला अधिक मजबूत बनविण्यासाठी आपण सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी होऊन 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावू या, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, चेतना कॉलेज जवळ सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व अन्य प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा दाखवुन करण्यात आली. या रॅली मध्ये मुंबई शहरच्या अपर जिल्हाधिकारी फरोग मुकादम, अपर जिल्हाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी किरण महाजन, बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त विश्वास मोटे, उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, स्वीप चे नोडल अधिकारी डॉ.सुभाष दळवी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार आणि जिल्ह्यातील सायकल ग्रुपचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.