Monday, December 22 2025 12:42 pm
latest

थोर संत, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा समृद्ध करून भावी महाराष्ट्र घडवू या : धर्माधिकारी

सुयश कला-क्रीडा मंडळाची व्याख्यानमाला सुरू

ठाणे, ७ : संत ज्ञानदेव व छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा जतन करून, महाराष्ट्रालाच भावी समृद्ध भारत घडवायचा आहे, सध्या महाराष्ट्राची काहीशी आर्थिक पिछेहाट होत असली, तरीही शिवछत्रपती व थोर संतांचे विचार घेऊन आपण पुढे गेल्यास, महाराष्ट्र पुन्हा समृद्ध बनेल, असे परखड मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. महाराष्ट्राच्या नावातच `राष्ट्र’ असून, संत ज्ञानेश्वरापासून अनेक संत व छत्रपती शिवाजी महाराजांनी भारत एकसंध ठेवण्यासाठी योगदान दिले, असे श्री. धर्माधिकारी यांनी नमूद केले.

ठाणे पूर्व येथील सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने २१ व्या वर्षी श्री सिद्धिविनायक मंदिर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे पहिले पुष्प गुंफताना श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी `महाराष्ट्र समजावून घेताना’ या विषयावर महाराष्ट्राची आठव्या शतकापासूनची सद्यस्थिती व देशाच्या उभारणीतील महाराष्ट्राचे योगदान सविस्तरपणे विषद केले.
इस्लामी राजवटीला १०० वर्ष पूर्ण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी उत्तर भारताला भेट दिली होती. तेथील परिस्थिती समजून महाराष्ट्रात भक्तीमार्गाची चळवळ दृढ केली. संजीवन समाधी घेत असताना, संत नामदेवांना उत्तरेत जाण्यासाठी प्रेरणा दिली. संत नामदेवांनी पंजाबपर्यंत जाऊन भक्तीमार्ग विषद केला. संत ज्ञानेश्वर-संत नामदेवांप्रमाणेच इतर संतांनीही महाराष्ट्राला देशासाठी लढायचं आहे, हा संदेश जनतेला दिला. संत ज्ञानदेवांचा भक्तीमार्ग व छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य यांच्या एकत्रीकरणातून देश घडत गेला, असे प्रतिपादन अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
सध्या महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. फूट पाडणाऱ्यांची वृत्ती संकुचित असून, ते यशस्वी होणार नाहीत, असा विश्वास श्री. धर्माधिकारी यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राने १२ व्या शतकापासून देशासाठी लढा दिला. स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वी राजकीय, सामाजिक क्षेत्रात मराठी प्रतिभा झळकली होती. मराठी प्रतिभेमुळेच देशाला दिशा मिळाली. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. श्रीधर केतकर, इतिहासाचार्य राजवाडे, दादासाहेब फाळके यांच्यासारख्या अनेकांनी विविध क्षेत्रात मुहूर्तमेढ रोवली. देशात सामाजिक सुधारणांमध्ये शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव कायम अग्रणी आहे. यापुढील काळात बुद्धी व लेखणीचा वापर करुन भारतासाठी लढायचे आहे. संत ज्ञानदेव व छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा समृद्ध करून भारत घडवायचा आहे, असे प्रतिपादन श्री. धर्माधिकारी यांनी केले.
दरम्यान, या व्याख्यानमालेचे उद्घाटन श्री. धर्माधिकारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबरोबर अनेक वेळा भेट झाल्यानंतर आत्मियतेचे संबंध निर्माण झाले होते. दिघे साहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्री. धर्माधिकारी यांनी शुभेच्छा देऊन व्याख्यानाला सुरुवात केली.