Tuesday, December 23 2025 5:39 am
latest

डहाणू तालुक्यातील कोलवलीसह वाणगावच्या हरजीवन चॅरिटेबल ट्रस्टच्या व्यवहारांची चौकशी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 03 : कोलवली (ता. डहाणू) कोटीम, वाणगाव, चिंचणी गावातील शेतकरी वडिलोपार्जित शेती कसत असलेल्या जमिनींच्या सातबारावरील कुळांची नांवे कमी करण्यासाठी डहाणू तहसीलमध्ये हरजीवन चॅरिटेबल ट्रस्ट यांनी दावा दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणात ट्रस्टच्या एकंदरीत व्यवहाराची शासनस्तरावरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल. कूळ कायद्यांतर्गंत शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य मनीषा चौधरी यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते.

त्यांनी सांगितले की, या प्रकरणी जिल्हाधिकारी, पालघर यांच्या प्राप्त अहवालावरून असे स्पष्ट होते की, मौजे कोलवली व वाणगांव, ता. डहाणू, जि. पालघर येथील हरजीवन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या मालकीच्या या मिळकतीवर सातबारा इतर अधिकारात कुळांची नांवे दाखल असल्याने या ट्रस्टतर्फे तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, डहाणू यांच्याकडे दावा दाखल करण्यात आला आहे. या दावा प्रकरणामध्ये अर्जदार तसेच, सामनेवाले कुळ यांनी त्यांचे लेखी म्हणणे, सुनावणी दरम्यान सक्षम प्राधिकाऱ्यांकडे दाखल केले आहे. तसेच, या प्रकरणी सुनावणीची कार्यवाही सुरू असून महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ च्या प्रचलित तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत संबंधितांची एकत्रित बैठक घेऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन उचित कार्यवाही केली जाईल, असे मंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

०००