Monday, December 22 2025 10:55 pm
latest

ठाण्यात मालवणी महोत्सवाला विकेण्ड झुंबड

रविवारी खवय्यांनी लुटला सामिष मेजवानीचा आनंद 

ठाणे,१२ – कोकणचा निसर्ग, तेथील संस्कृती,लज्जतदार सामिष खाद्यपदार्थ, कोकणी संगीत आणि कोकणची कला…असे सारे काही, अनुभवण्यासाठी विकेण्डच्या सुट्टीला रविवारी ठाण्यातील शिवाईनगर येथील मालवणी महोत्सवात खवय्यांची झुंबड उडाली. येत्या १९ जाने.पर्यंत हा मालवणी महोत्सव सुरू असुन ठाणेकरांनी या कोकणच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले आहे.
कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने पोखरण रोड नं.१, शिवाई नगर येथील उन्नती गार्डन मैदानात शुक्रवार १० जानेवारी पासून मालवणी महोत्सवाला सुरूवात झाली. मालवणी महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर कोकणची संस्कृती दर्शविणाऱ्या कौलारू गणेश मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविकांना साक्षात कोकणची अनुभूती येते. गणेश मंदिरात कोकणी धाटणीच्या सुरावटीत रंगलेल्या भजन संगीतात रममाण होत दर्शन घेतल्यानंतर भाविक मालवणी महोत्सवाच्या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी जातात. या महोत्सवात खास उभारलेल्या व्यासपीठावर मनोरंजनाच्या कार्यक्रमांचीही लयलुट सुरू असते. तसेच, कोकणच्या संस्कृतीबरोबर कोकणी पदार्थाची विक्री करणारे महिला बचत गटाचे स्टॉल, तसेच, सुकामेवा, मालवणी पदार्थांमध्ये ताजे मासे, चिकन-वडे, मटण,सागुती यांचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे स्टॉल आहेत. १२ जानेवारी रोजी रविवारचा मुहुर्त साधुन मालवणी महोत्सवात ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. यावेळी मांसाहारी स्टॉलवर खवय्यांची झुंबड उडाली होती. अनेकांनी सहकुटुंब चिकन-मटण आणि मासळीच्या सामिष भोजनाचा आनंद लुटला. तसेच, विविध वस्तु व जिन्नसांची खरेदी करण्याचीही संधी साधली. यावेळी आयोजक सीताराम राणे आणि कोकण ग्रामविकास मंडळाच्या स्वयंसेवकांची टीम महोत्सवाच्या उत्तम नियोजनाचे काम पार पाडीत आहेत.