Friday, March 6 2026 5:07 am

ठाणे शहरात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहिम

ठाणे -14 : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ठाणे शहरात डिसेंबर २०२२ व जानेवारी 2023 या कालावधीत विशेष गोवर रुबेला मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची पहिली फेरी 15 ते 25 डिसेंबर 2022 आणि दुसरी फेरी 15 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत पार पडणार आहे. या मोहिमेत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
गोवर रुबेला लसीचा पहिला डोस ९ ते १२ महिने वयोगटात, तर दुसरा डोस १६ ते २४ महिने वयात घेणे अपेक्षित आहे. 9 महिने ते 5 वर्षाच्या बालकांचा गोवर रुबेला लसीचा पहिला किंवा दुसरा डोस अथवा दोन्ही डोस राहिलेल्या बालकांना वंचित डोस या विशेष मोहिमेमध्ये देण्यात येणार आहे.
तसेच गोवर रुबेला लसीच्या कोणत्याही दोन डोसमधील अंतर हे 28 दिवसाचे राहिल याबाबत दक्षता घ्यावी. गोवर रुबेला लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविका यांना घरोघरी जावून सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिका क्षेत्रामध्ये माहे नोव्हेंबर 2022 पासून गोवर रुबेला प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये घरोघरी सर्वेक्षण करुन ताप व पुरळ असणाऱ्या रुग्णांना शोधून त्यांना आवश्यक औषधोपचार देण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार माहे नोव्हेंबर पासून एकूण 47040 बालकांचे गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले आहे.
‘गोवर आणि रुबेलाला हरवूया ..हे लसीकरण नक्की करुया’ असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले असून महानगरपालिकेच्या सर्व आरोग्यकेंद्रातंर्गत नियमित लसीकरण सत्रे व अतिरिक्त लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आले आहे.