Monday, December 22 2025 11:05 pm
latest

ठाणे महापालिका मुख्यालयात घेण्यात आली मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ

मतदानाचा हक्क बजावण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आवाहन

ठाणे, १४ : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मतदार जागृती धोरण राबविण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, ठाणे जिल्ह्याने मतदारांचा सहभाग आणि नागरी सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे. या स्वीप कार्यक्रमांतर्गत, गुरूवार, १४ नोव्हेंबर रोजी ठाणे महापालिका मुख्यालयात मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी महापालिका कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांना शपथ दिली.

ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या सामुहिक शपथ उपक्रमाचे, ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यात उपायुक्त (समाजविकास) अनघा कदम, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर आदी उपस्थित होते.

स्वाक्षरी फलकाचे उद्घाटन

त्याचबरोबर, स्वीप कार्यक्रमांतर्गत, मतदार जागृतीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय तसेच प्रभाग समिती कार्यालय येथे ‘मी मतदान करणार’ हा फलक ठेवण्यात आला आहे. त्यावर स्वाक्षरी करून नागरिकांनी मतदानाबद्दलची ग्वाही द्यावी, अशी या फलकामागची संकल्पना आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या फलकावर स्वाक्षरी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे स्वाक्षरी केली. त्यानंतर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम आदींनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. हा फलक महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर दर्शनी भागात ठेवण्यात आला असून त्यावर नागरिकांनी सही करावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.

नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, त्याचबरोबर, निवडणुकीच्या कामावर तैनात असलेल्या महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पोस्टल मतदानाच्या सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचे कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.