Monday, December 22 2025 5:53 pm
latest

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मतदार केंद्रावर शनिवारपासून सर्वंकष स्वच्छता मोहीम

मतदान केंद्र, परिसर, रस्ते, पदपथ यांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

ठाणे, १५ : बुधवार, २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मतदार केंद्र आणि त्याच्या परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेत मतदान केंद्र, १०० मीटरचा परिसर, नजिकची सार्वजनिक शौचालये, पदपथ, मतदान केंद्राकडे येणारे रस्ते, चौक, दुभाजक यांच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

मतदान केंद्रावर होणारी नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचारी व मतदानासाठी येणारे नागरिक यांच्या सोयीसाठी मतदान केंद्र व सभोवतालचा परिसर स्वच्छ असणे आवश्यक आहे. त्यामुळे, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि प्रभाग समिती यांच्या समन्वयाने १६ ते १८ नोव्हेंबर या तीन दिवसांत स. ७ ते स. ११ या वेळेत या सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी कळवा, मुंब्रा आणि दिवा या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाईल. रविवार, १७ नोव्हेंबर रोजी मानपाडा-माजिवडा, वर्तकनगर, उथळसर या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाईल. तर, सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी नौपाडा-कोपरी, वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर- सावरकर नगर या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाणार आहे.

संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून या मोहिमेची आखणी करण्याच्या सूचना सर्व उपायुक्त परिमंडळ आणि सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत. तसेच, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) आणि आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत या मोहिमेसाठी लागणारे मनुष्यबळ, साधन सामु्ग्री यांची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी मतदान केंद्र निहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याचेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

मतदान करण्याचे आवाहन

दरम्यान, ठाणे महापालिकेने ‘मी मतदान करणार’ ही मोहीमही राबवली असून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरून लोकशाहीतील नागरिकांचे हे कर्तव्य बजावावे, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.