Monday, December 22 2025 10:48 pm
latest

ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठाणे दिवाळी मेळावा कारागृह निर्मित वस्तू प्रदर्शन व विक्री उद्घाटन सोहळा संपन्न

ठाणे,29:- अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा व महाराष्ट्र राज्य, पुणे प्रशांत बुरडे (भा.पो.से) व विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ.जालिंदर सुपेकर (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून व कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई श्री. योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी मेळावा, ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांनी दिवाळी सणानिमित्त बनविलेल्या वेगवेगळ्या कारागृह निर्मित वस्तू व प्रदर्शन विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्यास ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक श्रीमती राणी भोसले तसेच कारागृहाचे अधिकारी/कर्मचारी व अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचा एक घटक आहे. बंदी भविष्यात कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कौशल्य असावे या हेतूने व कारागृहाचे ध्येय सुधारणा व पुनर्वसन या दृष्टीकोणातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. तसेच महिला बंद्यांकडून आकर्षक पणती, तोरण, हस्तकलेच्या वस्तू तयार करण्यास प्रयास (TISS) व पुरुष बंद्यांकडून आकाश कंदील तयार करण्यात सत्संग फाउंडेशन व वात्स्यल्य ट्रस्ट या अशासकीय संस्थेकडून योगदान देण्यात येते. कारागृहातील बंद्यांचे कौशल्य समाजापुढे यावे, या उद्देशाने बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृह निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री तसेच दरवर्षी दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.
दिवाळी मेळाव्यानिमित्त कारागृह निर्मित वस्तू व प्रदर्शन विक्री केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे कौतुक करुन सर्व जनतेला या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले, तसेच जास्तीत जास्त बंद्यांना रोजगाराभिमुख व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना कारागृहातून बाहेर गेल्यावर उपजीविकेचा मार्ग तयार होवून बंद्यांच्या आयुष्यात प्रकाशपर्व येईल. आधुनिक यंत्रसामग्री नसताना देखील उपलब्ध साधनसामुग्रीवर या बंद्यांनी दर्जेदार उत्पादन तयार केले. बंद्यांच्या या उद्यमशिलतेचे कौतुक करुन बंद्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या उपक्रम/प्रशिक्षणाबाबत कारागृह प्रशासन व अशासकीय संस्थेचे अभिनंदन केले. या माध्यमातून दिवाळीच्या आनंदाच्या सणानिमित्त बंद्यांच्या आयुष्यात आशेचा व आनदांचा प्रकाश पडेल, अशी अपेक्षा व्यक्त करुन सर्व बंदी बांधवांना त्यांनी दीपावली सणाच्या शुभेच्छा दिल्या.
या बंद्यांनी तयार केलेले आकाश कंदील, मातीच्या आकर्षक रंगकाम केलेल्या पणत्या, सुतारकाम विभागात सागवानी लाकडाच्या तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तू, सागवानी लाकडाच्या खुर्च्या, चौरंग, देवघर, पाट, चारचाकी गाडया, बैलगाडी, रिव्हॉल्विंग चेअर, हट टाईप की स्टँड, मोबाईल स्टँड, तसेच शिवणकाम विभागातील जॅकेट, सुती टॉवेल, सुती हात रूमाल, बेकरी उत्पादने, ओटस बिस्कीट, इत्यादी आकर्षक वस्तू दिवाळी मेळाव्यात विक्रीकरिता ठेवण्यात आल्या होत्या. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रदर्शन व विक्री केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भेट देऊन वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.