नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे –
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांचे आवाहन
ठाणे, 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे. ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची कामे युद्ध पातळीवर सुरू झाली. ठाणे जिल्ह्यात 134 भिवंडी ग्रामीण, 135 शहापूर (अ.ज.), 136 भिवंडी पश्चिम, 137 भिवंडी पूर्व, 138 कल्याण पश्चिम, 139 मुरबाड, 140 अंबरनाथ, 141 उल्हासनगर, 142 कल्याण पूर्व, 143 डोंबिवली, 144 कल्याण ग्रामीण, 145 मिराभाईंदर, 146 ओवळा माजिवडा, 147 कोपरी पाचपाखाडी, 148 ठाणे, 149 कळवा-मुंब्रा, 150 ऐरोली, 151 बेलापूर या 18 मतदारसंघाचा समावेश आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 18 निवडणूक निर्णय अधिकारी व 18 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली असून निश्चितच याचा परिणाम मतदान वाढीवर होणार आहे.
सहा मतदारसंघात दोन बॅलेट युनिट
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 244 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील 138 कल्याण पश्चिम, 140 अंबरनाथ (अ.जा), 141 उल्हासनगर, 142 कल्याण पश्चिम, 145 मीरा भाईंदर, 150 ऐरोली विधानसभा या 6 मतदारसंघातील निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी दोन बॅलेट युनिट असणार आहेत.
जिल्ह्यात 6955 मतदान केंद्रे सज्ज
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 6894 ही मूळ मतदान केंद्रे व 61 सहायकारी मतदान केंद्रे अशी एकूण 6955 मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत. या मतदान केंद्रांवर एकूण 8273 बॅलेट युनिट, 8273 कंट्रोल युनिट तर 8962 व्हीव्हीपॅट लागणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर लागणाऱ्या मशीन्सची सरमिसळही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी समक्ष झाली असून मतदान केंद्रावरील सर्व मशीन सीलबंद करण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी दिली.
जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर 30868 जणांची नियुक्ती
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघातील 6955 मतदान केंद्र असून या प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व पोलीस कर्मचारी असे पथक मतदानाच्या दिवशी कार्यरत असणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 6955 मतदान केंद्रावर एकूण 7717 मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1- 7717, इतर मतदान अधिकारी – 15434 अशा एकूण 30868 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर करावयाची कामे याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून मतदान केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध
मतदारांना मतदान सहजतेने करता यावे यासाठी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय, रांगेत उभे असणाऱ्या मतदारांसाठी खुर्च्यांची सोय, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअरची सुविधा, रॅम्पची सोय, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये आदी सुविधा करण्यात येणार आहे. तसेच एकाच ठिकाणी अनेक मतदान केंद्रे असल्यास मतदान चिठ्ठीवर विविध रंगाचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरुन मतदारांचा मतदान करण्यासाठीचा वेळ वाचणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया नि:पक्षपाती, निर्भयपणे व शांततेत पार पाडाव्यात यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शिनगारे यांनी सांगितले.
मतदान केंद्रांचे होणार वेबकास्टिंग
जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील एकूण 6955 पैकी महापालिका हद्दीतील 5821 तर ग्रामीण भागातील 714 मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा असणार आहे.
निवडणूककामी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. 19 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना होतील.
दिव्यांग व ज्येष्ठांसाठी सुविधा उपलब्ध
अंध दिव्यांग मतदारांना सर्व मतदार केंद्रावर रॅम्प, व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून “सक्षम प्रणालीद्वारे” विनंती करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर ने- आण करण्याची व्यवस्था करण्यात आली असून दिव्यांगांना रांगेत उभे न राहता मतदान करता येणार आहे. तसेच ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा देखील प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात आली आहे.
