Monday, December 22 2025 2:12 pm
latest

ठाणे जिल्ह्यातील भात व नाचणी उत्पादक शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा घेण्याचे आवाहन

ठाणे, 20 – विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. सन २०२३-२४ पासून सदर योजना फक्त रक्कम रु.1/- शेतकरी हिस्सा भरून सर्वसमावेशक पिक विमा योजना म्हणून राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात भात व नाचणी ही पिके सदर योजनेतर्गत अधिसूचित आहेत. या योजनेत ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दि.15 जुलै 2024 पर्यंत अर्ज करून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी केले आहे.

भात व नाचणी पिकासाठी निर्धारित केलेल्या विमा हप्त्याच्या शेतकरी हिश्श्याच्या अनुक्रमे रक्कम रु. १०३५.२०/- व रक्कम रु.४००/- पैकी रक्कम रु.१/- भरून शेतक-यास विमा योजनेत सहभागी होता येणार आहे व उर्वरित शेतकरी हिश्श्याची रक्कम राज्य शासन भरणार आहे. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पिक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्टीने शेती शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे. सदर योजनेतर्गत सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के इतका आहे. तसेच विमा हप्ता सर्व पिकांसाठी प्रती अर्ज रु. 1/- एवढा आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षातील सर्वाधिक उत्पादनाच्या 5 वर्षांचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकांचा जोखीम स्तर विचारात घेवून निश्चित केले जाते.

विमा संरक्षणाच्या बाबी –
1) हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान (Prevented Sowing/Planting/Germination).
2) पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Mid season Adversity).
3) पिक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट.
4) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान(Localized Calamities).
5) नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान (Post Harvest Losses) नुकसान भरपाई मिळण्यासाठी
• नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे आकस्मात नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत याबाबत केंद्र शासन पीक विमा अॅप, संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे कळवावे. यात नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली जाते.
• विमा योजनेतंर्गत सर्व प्रकारची नुकसान भरपाई रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. त्यामुळे बँक खाते योग्य नोंदविण्याची खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन श्री. कुटे यांनी केले आहे.

विमा योजनेत सहभागी होण्याकरिता –
• अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजनेत भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान 7 दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळविणे गरजेचे आहे.
• इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून,हप्ता भरून सहभाग घ्यावा.हप्ता भरलेली पोहोच पावती त्याने जपून ठेवावी.
• कॉमन सर्विस सेंटर आपले सरकारच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.

महत्त्वाच्या नवीन बाबी –
• या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागेल. शेतातील पीक आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास ई-पीक पाहणी मधील नोंद अंतिम धरण्यात येईल. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ई – पीक पाहणीमध्ये वेळेवर करावी.
• यावर्षी भात पिकामध्ये महसूल मंडळामधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेंसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास 30 टक्के भारांकन आणि पिक कापणी प्रयोगद्वारे आलेल्या उत्पादनास 70 टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.
• भाडे कराराद्वारे पीक विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार प्रत पिक विमा पोर्टलवर अपलोड करावी लागेल.
• पीक विमा योजनेत सहभागी होण्यापूर्वी मयत असलेल्या शेतकऱ्याच्या नावे किंवा त्याच्या नावे असलेल्या जमिनीवर विमा योजनेत सहभाग घेतल्याचे निदर्शनास आल्यास विमा अर्ज अपात्र होईल.

योजनेत सहभागाची अंतिम मुदत – दि.१५ जुलै २०२४ असून ठाणे जिल्ह्यात ही योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कं. या कंपनीद्वारे राबविण्यात येत आहे. या संबंधी टोल फ्री नं – १४४४७ व ईमेल uiicpmfby2023@uiic.co.in येथे संपर्क साधता येईल.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागासाठी पिक विमा पोर्टल दि.15 जून 2024 पासून कार्यान्वित झालेले आहे. तरी या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी केले आहे.