ठाणे, 20 – जिल्हा परिषद ठाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रोहन घुगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदाचा पदभार आज स्वीकारला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार प्रकल्प संचालक जि. प. ठाणे छायादेवी शिसोदे यांच्याकडे होता. छायादेवी शिसोदे यांनी जिल्हा परिषदेचा कार्यभार उत्कृष्टपणे सांभाळला आहे. सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते व प्रकल्प संचलक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यापूर्वी रोहन घुगे वर्धा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते सन २०१८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द यशस्वी राहिलेली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तिमिरातूनी तेजाकडे नेण्याकरिता रोहन घुगे यांच्या संकल्पेतून विविध प्रयोग राबविले गेले. यातूनच मिशन दीपस्तंभ राबवून विद्यार्थ्याचा गुणवत्ता विकास साधला. याचीच फलश्रुती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना देशातील नामांकीत ‘स्कॉच’ पुरस्कार मिळाला आहे.
कुपोषण मुक्त ग्राम अंतर्गत कुपोषित व अति तीव्र कुपोषित बालकांना पोषण किट वेळोवेळी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून विकास कामांना उंचावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी मोलाचे काम वर्धा जिल्ह्यात केले आहे.
वर्धा जिल्हा राज्यात पहिला पीएम विश्वकर्मा राबविण्यात रोहन घुगे यांनी विषेश प्रयत्न केले आहेत. कुपोषण, शिक्षण, कृषि, पशु, आरोग्य अशा विविध विषयावर अभ्यासपुर्वक कामकाज त्यांनी केले असून विविध नाविन्यपुर्ण योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी मोलाचे कामकाज वर्धा जिल्ह्यात केले आहे.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभागांच्या प्रगति पथावर असलेल्या कामांचा आढावा घेतला. शिक्षण विभागातील रिक्त पदे, शाळा भेटी, विद्यार्थी संख्या यांची माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिली.ग्रामीण भागात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन नियोजन संदर्भातील माहिती घेण्यात आली. ग्रामस्थांच्या कल्याणासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन विकास कामांची प्रत्यक्ष पाहाणी करण्याचे नियोजन करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या कामांना अधिक गती आणण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांनी प्रयत्नशील राहायला हवे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु. व स्व) प्रदिप कुलकर्णी, लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे आदी यावेळी उपस्थित होते.
