ठाणे, 14 :- निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूका 2024 च्या अनुषंगाने या निवडणूकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आज 14 नोव्हेंबर, सकाळी 11.00 वाजता जिल्हा परिषदेच्या आवारात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांच्या नेतृत्वाखाली मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली.
या सामूहिक शपथ कार्यक्रमास उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, कृषि विकास अधिकारी मुनिर मैनोद्दीन बाचोटीकर तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु” ही सामूहिक शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली.
