ठाणे,03:- जमीन मोजणी हा नागरिक तसेच शेतकरी बांधव यांच्या जिव्हाळ्याचा विषय..! जमीन मोजणी अर्ज सध्या ऑनलाईन भरण्याची सोय करून दिली असून असा अर्ज भरल्यानंतर नागरिकांना मोजणी कार्यालयाकडून आगाऊ नोटीसा दिल्या जातात. मोजणीबाबत अनेक वेळा काही अडचणी येत होत्या जसे की, भूकरमापक मोजणी दौऱ्यानुसार आगाऊ नोटीशीने कळवून मोजणी कामी जागेवर जात असतात. काही भूकरमापक हे जागेवर उशिरा पोहोचत असल्याने मोजणी अर्जदार, लगतधारक यांना काही अडचणी उद्भवत होत्या.
मोजणी अर्जदार तसेच भूकरमापक यांच्यामध्ये समन्वय राहावा तसेच भूकरमापक हे निश्चित कुठे आहेत, याबाबत स्पष्टता यावी, याकरिता मोजणीकामी भूकरमापक यांनी लाईव्ह लोकेशनचा वापर करण्याचे ठरविले आहे. जमीन मोजणी प्रक्रिया दिवसेंदिवस सोपी आणि जनताभिमुख करण्याचा अधिकारी स्तरावर देखील कसोशीने प्रयत्न केल्याने आता बहुतांश ऑनलाईन पद्धतीचा वापर सुरु झाल्याने सर्वसामान्य नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला असून यामध्ये त्यांनी प्रशासकीय सुधारणांवर भर दिला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून मोजणी प्रक्रियेमध्ये व्हॉट्सॲप लाईव्ह लोकेशनचा वापर करून अर्जदारांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील, या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भूकरमापक यांनी त्यांच्या मोजणी दौऱ्याप्रमाणे मोजणीस जाण्यापूर्वी त्यांचे लाईव्ह लोकेशन संबधीत अर्जदार, लगतधारक तसेच कार्यालयप्रमुख यांच्या भ्रमणध्वनीवर व कार्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे अर्जदार, लगतधारक यांना भूकरमापक हे मोजणी स्थानापासून किती अंतरावर आहेत व मोजणी स्थळी पोहोचण्यास किती कालावधी लागेल याबाबत ठोस माहिती तात्काळ उपलब्ध होईल. तसेच मोजणीचे थेट स्थान (लाईव्ह लोकेशन) शेअर केल्याने कार्यालयप्रमुख यांनादेखील आपले कर्मचारी मोजणी स्थानी पोहोचले आहेत किंवा नाही याबाबत माहिती मिळते व कार्यालयप्रमुख यांना अर्जदार, लगतधारक यांच्याकडून विचारणा झाल्यास त्याप्रमाणे त्यांना माहिती देण्यास सोईचे होते. यामुळे दैनंदिन माहिती मोजणी कामावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मोलाची मदत होत आहे.
भूमी अभिलेख विभागाच्या ऑनलाईन ई-मोजणी, इप्सित पोर्टलवर ऑनलाईन फेरफार अर्ज सुविधा आणि प्रत्यय या प्रणालीद्वारे ऑनलाईन अपील अर्ज नागरिक अथवा विधीज्ञ यांना दाखल करता येतील. या आणि अशा सुविधा शासनाच्या “महाभूमी” या पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या असून नागरिकांनी सर्व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील यांनी केले आहे.
