Monday, December 22 2025 7:18 am
latest

‘जनसंवाद’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी; बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, 12 : वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. तसेच जनसंवाद कार्यक्रमात बदल्यांची निवेदने स्वीकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांना 256 टोकन वितरित करण्यात आली. आस्थेवाईकपणे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी निवेदनांचा स्वीकार करीत संबंधितांना कार्यवाहीचे निर्देश दिले. यात प्रामुख्याने वैद्यकीय मदतीचे अर्ज तत्काळ मार्गी लावावेत. जनसंवाद हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आहे. त्यामुळे बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवावेत, असे मंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.

प्रामुख्याने सांडपाणी, वीज, पाणी, रस्ते कामांची निवेदने पाहायला मिळाली. यात नगरपंचायत, नगरपरिषद, ग्राम स्तरावरील कामांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसून आले. महिलांपासून वयोवृध्द नागरिकांपर्यंत, तरूणांपासून दिव्यांग व्यक्तींनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपली निवेदने दिली. निवेदन देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यादृष्टीने मंडप, नाश्ता , चहा व कुलर्सची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी स्वयंशिस्तीचा प्रत्यय देत टोकन पद्धतीनुसार निवेदने दिली.

नागरिकांची शासनाकडे प्रलंबित व नियमानुसार करता येणारी कामे दिरंगाई न करता तातडीने पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी शासकीय विभागांना दिले. सर्व निवेदने, समस्या व इतर प्रकरणांविषयी संबंधित विभागाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असेही श्री. बावनकुळे यांनी यावेळी निर्देश दिले.