Tuesday, December 23 2025 6:16 am
latest

छत्रपती संभाजीनगरमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला तत्वत: मंजुरी – पालकमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई,11 : छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाच्या मालकीच्या आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेत आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांनी क्रिडा विभागास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

मंत्रालयात छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक दर्जाचे फुटबॉल स्टेडियम आणि गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात पालकमंत्री श्री. सत्तार यांनी आज बैठक घेतली.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय क्रीडा संकुलातील खेळाडूंना क्रीडा संदर्भातील सर्व सोयी -सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियमसंदर्भातील प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांनी क्रीडा विभागास सादर करावा. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना यश मिळविता यावे, यासाठी सर्व साहित्य त्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.