Monday, December 22 2025 8:52 pm
latest

घोडबंदरवासींच्या माथी टँकरपोटी लाखोंचा बोजा

तत्काळ २५ एमएलडी पाणी द्या-आ.संजय केळकर..

नागपूर, 18 : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील पाणी टंचाईचा मुद्दा उपस्थित करत तातडीने अतिरिक्त २५ एमएलडी पाणी देण्याची मागणी केली. घोडबंदर भागात रहिवाशांना टँकरपोटी नाहक दरमहिना लाखो रुपये मोजावे लागत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

ठाण्यात विशेषतः घोडबंदर परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज आणि पुरवठा यात मोठी तफावत असून पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. लाखो रुपयांची कर्जे घेऊन या भागात घरे घेतलेल्या नागरिकांना मालमत्ता, पाणीपट्टी असे कर भरूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याची खंतही श्री.केळकर यांनी सभागृहात व्यक्त केली.

एकीकडे पाणी टंचाईने रहिवासी होरपळत असताना आणि टँकर लॉबी गब्बर होत असताना दुसरीकडे बहुमजली इमारतींची संकुले मोठ्या प्रमाणात घोडबंदर भागात उभी राहत आहेत. या संकुलामध्ये हजारो कुटुंबे वास्तव्यास येणार आहेत. आधीच अपुरा पाणी पुरवठा होत असताना नव्या वसाहतीतील नागरिकांना पाणी कुठून देणार असा प्रश्नही श्री.केळकर यांनी उपस्थित केला आहे.

ठाणे शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेला मी पत्र दिले असून पाठपुरावाही करत आहे. शहराला ५० एमएलडी ज्यादा पाणी देण्यास मंजुरी मिळाली आहे, पण त्यापैकी २५ एमएलडी पाणी तातडीने दिल्यास घोडबंदर परिसर टँकरमुक्त होईल, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.