• महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश
• नुतनीकरणाच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी
ठाणे, १४ : ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहे. कंत्राटदाराने हे काम विहित मुदतीत पूर्ण करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ही वास्तू लवकरात लवकर रसिक आणि नाट्यकर्मी यांच्यासाठी खुली व्हावी, अशी अपेक्षाही आयुक्त राव यांनी व्यक्त केली.
सन १९७८मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची १९९८मध्ये प्रथम मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता २६ वर्षांनी नुतनीकरण होत आहे. ऑक्टोबर महिन्यात नुतनीकरणाचे काम सुरू झाले असून ९० दिवसांच्या अवधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामाच्या सद्यस्थितीची पाहणी आयुक्त राव यांनी बुधवारी सायंकाळी केली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त उमेश बिरारी, उपनगर अभियंता विकास ढोले व शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते.
गडकरी रंगायतनमधील सुधारणा करताना रंगायतनचे पारंपरिकपण जपले जाणार आहे. तसेच, काळानुरुप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल, हा उद्देश नजरेसमोर ठेवून रंगायतनचे नूतनीकरण केले जात आहे.
नुतनीकरणात प्रामुख्याने, मुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नुतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच-फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा, शौचालयांचे संपूर्ण अद्यावतीकरण आदी कामांचा समावेश आहे. नाट्यकर्मींशी चर्चा करून या कामांची रुपरेषा ठरवण्यात आली आहे.
आयुक्त राव यांनी मुख्य रंगमंच, प्रेक्षागृह, प्रवेशद्वार यांच्या कामाची पाहणी केली. रंगायतनचे प्रवेशद्वाराची आधुनिक पद्धतीने रचना करावी, अशी सूचना राव यांनी केली. तसेच, आसनव्यवस्था करताना प्रेक्षकांची सोय लक्षात घेऊन निवड केली जावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ध्वनी यंत्रणा, वातानुकूलन यंत्रणेची व्यवस्थित तपासणी करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. मुख्य वास्तूच्या सुशोभीकरणासोबतच वास्तूच्या बाहेर असलेला भागही सुशोभित करण्यात यावा. त्यावर योग्य पद्धतीची विद्युत रोषणाई केली जावी, असेही आयुक्त राव म्हणाले.
