Monday, December 22 2025 11:23 am
latest

कोळी समाजाला उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करणाऱ्या अरविंद कोळी यांना समाजभूषण पुरस्कार

ठाणे, 16 : महर्षी वाल्मीकी ऋषी, व्यास मुनी, भृशुंडी ऋषी, कर्ण राजा, अशा संत, नरवीरांचा वारसा लाभलेला कोळी समाज शिक्षणाचा आधार घेऊन सक्षम होत आहे. या समाजातील अधिकतम बांधव पारंपरिक शेती, मासेमारी व्यवसाय व जोड व्यवसाय करीत असून, या समाजातील बांधवांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवावा या हेतूने अरविंद कोळी यांनी केलेल्या मार्गदर्शनाने आज कोळी समाजातील अनेक तरूण् पोलीस, संरक्षण दल, आदी क्षेत्रांकडे वळले आहे, तसेच उच्च शिक्षण घेऊन संशोधक, इंजिनिअर, डॉक्टर, उद्योगपती, नोकरी, वकिली आणि शिक्षक अशा विविध क्षेत्रांत स्थिरावले आहे, त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांना नुकतेच कोकण मराठी पत्रकार संस्थेच्यावतीने समाजभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी गृह राज्यमंत्री योगेश दादा कदम त्यावेळी दैनिक प्रहार चे संपादक सुकृत खांडेकर , कोकण मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, अनिलराज रोकडे , दिलीप देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याचबरोबर अरविंद कोळी यांनी समाजाचे विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविले. समाजातील मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणे, त्यांना शालेय साहित्य मोफत उपलब्ध करून देणे असे उपक्रम सुरू केले. शिवाय समाजातील अशिक्षितपणा आणि असंघटितपणा घालविण्यासाठी दरमहा मंडळातर्फे समाजातील बांधवांची बैठक घेणे सुरू केले. या बैठकीद्वारे शिक्षणाचे महत्त्व, शासनाच्या सोयी-सुविधा, नोकरीविषयक मार्गदर्शन, व्यवसाय-उद्योग, आदींबाबत चर्चा करून मार्गदर्शन करण्यात येत होते. केंद्र शासनाच्या १९७६ च्या अधिसूचनेनुसार समाजास अनुसूचित जमातीचे दाखले मिळू लागले. शासकीय नोकरी मिळाली. मात्र, बिगर आदिवासी स्वरूपाचे फायदे घेत आहेत म्हणून खोटे ठरवून युवकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. पुराव्याच्या आधारे न्यायालयीन लढा सुरू होता. त्यासाठी अरविंद कोळी यांनी स्वतः लढा दिला. त्यामध्ये यश आले नाही. त्यामुळे निराशा निर्माण झाली. त्यानंतर मंडळाला ऊर्जितावस्था मिळावी आदिवासी कोळी समाज वेल्फेअर असोसिएशनची स्थापना करून कार्य सुरू ठेवले आहे.
शिक्षणाच्या जोरावर सक्षमतेच्या दिशेने हा समाज वाटचाल करीत आहे. तो आता केवळ आपल्या पारंपरिक व्यवसायापुरता मर्यादित राहिलेला नसून अन्य क्षेत्रांतही कार्यरत आहे.अरविंद कोळी यांच्या पाठपुरावा आणि प्रयत्नाने अनेक बांधव शिक्षणासह शासनाच्या विविध खात्यांमध्ये अधिकारी, तसेच उद्योगपती, शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंता अशा क्षेत्रांत कार्यरत आहेत. यात पुरुषांप्रमाणे महिलांचादेखील समावेश आहे. अरविंद कोळी हे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजातील कलाकारांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासह उद्योग-व्यवसायासाठी समाजबांधवांना आर्थिक मदतीचा हात देत असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.