Monday, December 22 2025 6:57 am
latest

कलाविश्वाचा ताल चुकला-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली

नागपूर, १६: भारतीय अभिजात संगीताचा समृध्द खजिना सातासमुद्रापार दोन्ही हातांनी उधळणारे प्रतिभावान संगीतकार आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे जाणे, संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राचे हे नुकसान कधीही भरुन येणारे नाही. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला आणि डग्ग्याच्या जोडीत जणू नादब्रह्म सामावले होते.

उस्ताद अल्लारखाँ साहेबांसारखा पिता आणि गुरु त्यांना घरातच लाभला. कुरेशी घराणे हे तालविश्वातील एखाद्या नक्षत्रासारखे अढळ होते. अतिशय साधी राहाणी, आणि कुठलाही कर्मठपणा व्यक्तिमत्त्वात नसलेले उस्तादजी रसिकांना क्षणार्धात आपलेसे करत. भजनी ठेक्यापासून तबल्याचे अवघड कायदे आणि अनवट ताल त्यांच्या बोटात जणू वस्तीला होते. दिग्गज गायक-वादकांना संगत तर ते करत होतेच, पण तीन-तीन तास तबल्याची सोलो मैफल रंगवणारे बहुदा ते पहिलेच उस्ताद असतील. तबलावादनाला सरस्वतीचे पूजन मानणारा हा कुणी देवदूतच पृथ्वीवर येऊन गेला, असे आता म्हणावे लागेल.