Monday, December 22 2025 9:30 pm
latest

एच. आर. महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई,12: चर्चगेट येथील एच. आर महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असून कार्यान्वित असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सुनिल शिंदे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या. यावेळी चर्चेमध्ये सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

महाविद्यालयाने नवीन आर्किटेक्टची नेमणूक केली असल्याचे सांगून नगरविकास राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, महाविद्यालयाने आता बांधकामाचा प्रस्ताव नव्याने सादर केला आहे. त्याअनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. याठिकाणी केलेल्या पाहणीमध्ये काही बांधकामे अनधिकृत असल्याचे दिसून आले आहे. या अनधिकृत बांधकामांसंदर्भात चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.

यासंबंधी सदस्यांनी बृह्नमुंबई महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला असता त्याचे उत्तर इंग्रजीमध्ये देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर पर्यटन मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, मराठी ही राज्यभाषा असून इंग्रजीमध्ये उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक समज देऊन उत्तर मराठीमध्ये देण्याविषयी आदेश देण्यात येतील.