ठाणे,15:- प्रशिक्षण हा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा अविभाज्य घटक आहेत. या कार्यक्रमांतर्गत शेतकरी, क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येतात. फलोत्पादन पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचे तंत्रज्ञान शेतक-यांनी शास्त्रोक्त पद्धतीने अवलंब करण्यासाठी तसेच, उत्पादनांचे काढणीत्तोर व्यवस्थापन, निर्यातीला चालना देणे या उद्देशाने अशी प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात. त्याचप्रमाणे प्रशिक्षण प्रभावी होण्यासाठी यामध्ये प्रात्यक्षिकांचे आयोजन तसेच, यशस्वी व प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रांना भेटी दिल्या जातात.
सन 2014-15 च्या निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2024-25 या वर्षाकरीता मनुष्यबळ विकास घटकांतर्गत राज्यामध्ये संस्थानिहाय शेतकरी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याकरिता रू.56 लाख रकमेचा कार्यक्रम मंजूर असून त्या अंतर्गत खालीलप्रमाणे संस्थेमार्फत विभागनिहाय शेतकरी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
· राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था, एनआयपीएचटी, तळेगाव दाभाडे, ता.मावळ, जि.पुणे:- ठाणे, पुणे, कोल्हापूर व अमरावती विभाग
· कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि.पुणे:- नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर विभाग
· राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था, चितगाव फाटा, दारणा, ता.निफाड, जि.नाशिक
· आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा, जि.चंद्रपूर:- नागपूर विभाग
· हापूस आंबा गुणवत्ता केंद्र, दापोली:- ठाणे विभाग
· डाळिंब गुणवत्ता केंद्र, राहुरी:- पुणे विभाग
· केशर आंबा गुणवत्ता केंद्र, छत्रपती संभाजीनगर:- छत्रपती संभाजीनगर विभाग
· संत्रा गुणवत्ता केंद्र, नागपूर:- नागपूर व अमरावती विभाग
प्रशिक्षणामध्ये खालीलप्रमाणे फलोत्पादन व अनुषंगीक विषयावर प्रशिक्षण देणेबाबत नियोजन आहे.
· फळे व भाजीपाला रोपवाटिका
· कृषी व्यापाराबाबत धोरण व निर्यातीबाबत माहिती.
· जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन (आंबा, चिक्कू, संत्रा व मोसंबी)
· ड्रॅगनफ्रूट व जिरॅनियम य नाविण्यपूर्ण पिकांचे उत्पादनाचे तंत्रज्ञान
· औषधी, सुगंधी व मसाला पिकांचे उत्पादन, प्रक्रिया व विपणन.
· हरितगृह/पॉलिहाऊस व्यवस्थापन
· हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स
· काढणीपश्चात व्यवस्थापन (फळे व भाजीपाला)
· पीकनिहाय लागवड व प्रक्रिया (डाळिंब, हळद व आले)
मनुष्यबळ विकास कार्यक्रम या घटकाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे रक्कम रु.1 हजार प्रति प्रशिक्षणार्थी प्रति दिवस याप्रमाणे मापदंड अनुज्ञेय असून 3 ते 5 दिवसांचे निवासी प्रशिक्षण घेण्यात येते. यामध्ये, प्रशिक्षण साहित्य, चहापान, भोजन व निवास व्यवस्था इ. ची सुविधा आहे.
तरी, इच्छुक शेतकऱ्यांनी प्रशिक्षणासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या संस्थांना तसेच, अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणेचे संचालक डॉ.के.पी.मोते यांनी केले आहे.
