जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार
मुंबई, 24 : उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित असून जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार आहे; तसेच पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.
उरण (जि. रायगड) येथील भारत मुंबई कंटेनर टर्मिनलला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत विधानपरिषद सदस्य अभिजात वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
मंत्री भोसले म्हणाले की, संबंधित पुलामध्ये कोणतीही संरचनात्मक त्रुटी आढळलेली नाही. पुलालगतच्या भरावाचा काही भाग खालच्या मातीच्या थरात झालेल्या नैसर्गिक स्थिरीकरणामुळे (सेटलिंग); तसेच काही प्रमाणात अतिवजनाच्या वाहनांच्या वाहतुकीमुळे खचला असण्याची शक्यता आहे. मात्र, पुलाच्या सुरक्षिततेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
या दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो संबंधित ठेकेदाराकडून देखभाल करारातील (मेंटेनन्स क्लॉज) तरतुदीनुसार करण्यात येत आहे. भरावाची दुरुस्ती; तसेच आवश्यक काँक्रीटीकरणाचे काम जुलै 2026 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री भोसले यांनी सांगितले की, आयआरसीच्या निकषांनुसार राष्ट्रीय महामार्गांवरील पुलांचे आणि भरावांचे डिझाईन तयार केले जाते. अशा प्रकारच्या काही बाबी विविध ठिकाणी निदर्शनास आल्यानंतर संबंधित डिझाईनमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. नव्या डिझाईननुसार कामे करण्यात येत असून भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होणार आहे.
या कामासाठी कोणताही अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला नसून संबंधित एजन्सीवरच दहा वर्षांच्या देखभालीची जबाबदारी आहे. त्यामुळे पुढील कालावधीतही पुलाची देखभाल आणि आवश्यक दुरुस्तीची कामे संबंधित एजन्सीकडूनच करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी जबाबदार अधिकारी अथवा संबंधित बाबींची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.
