Monday, December 22 2025 12:43 pm
latest

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, 15 : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी या जागा राखेने समतल भरून घ्याव्यात, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षामध्ये नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मौजा सुरगाव येथील 344 एकर जागा शासकीय योजनेकरिता वापरण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजू पारवे, महसूल विभागाचे उपसचिव संजय धारुरकर, उपसचिव अश्विनी यमगर उपस्थित होते, तर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, सुरगाव शिवारातील पाणी साचलेल्या जुन्या खदानीत पाच जणांचा बुडून मृत्यू झाला होता. अशा खदानी भरून त्या समतल कराव्यात. खाणपट्ट्यांची नियमित तपासणी आवश्यक आहे. शर्तभंग करणाऱ्या खाणींवर कठोर कारवाई करावी. नागपूर जिल्ह्यातील खदानींमध्ये साचलेल्या पाण्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याने तातडीने उपाययोजना कराव्यात. नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी सर्व खाणपट्ट्यांची तपासणी आणि देखरेखीवर प्रशासनाने भर द्यावा. यासह, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खाणींच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.