Monday, December 22 2025 10:36 am
latest

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभ

पुणे, 11 : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभ हडपसर येथे करण्यात आला.

यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे, युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. हनुमंत शेळके, सचिव डॉ. स्वाती शेळके आदी उपस्थित होते.

सन २०३० पर्यंत रेबीज निर्मूलन करण्याचे ध्येय

डॉ. हनुमंत शेळके व डॉ. स्वाती जोगदंड शेळके या दाम्पत्याने २००९ साली बीड जिल्ह्यातून युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीची स्थापना केली. सन २०३० पर्यंत रेबीज निर्मूलन करण्याचे ध्येय समोर ठेऊन हे रुग्णालय सुरू केले आहे. ग्रामीण भागात श्वानांची वाढती संख्या, श्वानदंशामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका व त्यावर उपाय योजना राबविण्यासाठी उपलब्ध असलेले व्यवस्था, कर्मचारी राहण्यासाठी गैरसोय या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी फिरता दवाखाना सुरू केला आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात पशुवैद्यकीय सेवा देत आहेत.

महिन्याला ५०० शस्त्रक्रिया करण्याची क्षमता

फिरते पशुवैद्यकीय रुग्णालयाचे क्षेत्रफळ सुमारे २ हजार चौरस मीटर आहे. पहिल्यामजल्यावर १० कर्मचारी राहण्यासाठी व्यवस्था, महिन्याला ५०० शस्त्रक्रिया करण्याची क्षमता, ज्यामध्ये १०० कुत्र्यांना ठेवण्याची सुविधा, ऑपरेशन थिएटर, ओपीडी, आणि कन्व्हर्टेबल कॉन्फरन्स रूम, किचन, अभिलेख कक्ष, चर्चासत्र कक्ष व वातानुकूलित, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती, ओपीडी, लसीकरण, आपत्कालीन उपचार, नसबंदी आदी सुविधा उपलब्ध आहेत.