Tuesday, December 23 2025 1:49 am
latest

आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, 31: राज्यातील माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, प्रजनन व बाल आरोग्य विषयी सेवा अधिक प्रभावीपणे देणे, कुटुंब कल्याण उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या घटकांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. सन २०२३-२४ या वर्षापासून एक नविन आरोग्य पुरस्कार राज्यात सुरू झालेला आहे. हा पुरस्कार उत्कृष्ट काम करणारी स्वयंसेवी संस्था, उत्कृष्ट काम करणारे डॉक्टर, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार व कर्मचारी यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

याबाबतचा शासन निर्णयही निर्गमीत करण्यात आलेला आहे. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला, उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन डॉक्टरांना, उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला व ५ कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख रूपये असणार आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दरवर्षी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आयोजित करण्यात येईल. सन २०२३-२४ या वर्षात डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार नाही, असे शासन निर्णयात नमूद आहे.