मुंबई, 16 : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील खंडी-नैनवाडी या भागात मागेल त्याला वीजपुरवठा देण्यात आला आहे. आदिवासी भागातील विकासकामांसाठी आवश्यक निधी दिला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानससभेत सांगितले.
विधानसभा सदस्य राजू तोडसाम यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गडचिरोलीतील कातकरी, कोलम अशा प्रीमिटिव्ह आदिवासी भागात व्यक्तिगतरित्या वीज जोडणी देण्याचे काम सुरू असून, ज्यांनी अर्ज केला त्यांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘पीएम जनमन’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ८ हजार ५०० वीज जोडणी दिली गेली. प्रत्यक्षात ११ हजार वीज जोडण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात सुरुवातीला २७१ वीज जोडण्याची गरज होती, मात्र प्रत्यक्षात ६७१ कनेक्शन दिली गेली. भामरागडमध्ये देखील ६५ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. अगदी दोन-तीन व्यक्ती राहणाऱ्या पाड्यांपर्यंतही वीज पोहोचवण्यात आली आहे.
‘धरती आबा’ या नव्या योजनेंतर्गत आता सर्व आदिवासी समुदायांसाठी १७ योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वीज पुरवठ्याचा विशेष समावेश असून, ८० हजार कोटी रुपयांचा निधी यासाठी केंद्र शासनाने उपलब्ध करून दिला आहे.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात ६ हजार ९६१ वीज जोडणीचे लक्ष्य होते. आतापर्यंत ४ हजार ६८७ वीज जोडणी पूर्ण झाली असून, २९ कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. देशभरात या योजनेंतर्गत सर्वाधिक काम करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात ‘धरती आबा’ योजनेंतर्गत १४४ वीज जोडणी तर भामरागडमध्ये २८ वीज जोडणी करण्यात आली आहे. या योजनेमुळे आदिवासी बहुल गावांमध्येही वीज पोहोचवता येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी एक बृहत आराखडा तयार करण्यात आला असून, आरडीएसएफ आणि बाह्य अर्थसाहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्याच्या वीज वितरण नेटवर्कचे अपग्रेडेशन युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक भागात दूरवरून वीज आणावी लागते, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमधील त्रुटी भरून काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
