Monday, December 22 2025 2:28 pm
latest

आदिवासी पारधी समाज, मातंग समाज व मराठा समाज यांचे प्रश्न सोडविणार- नजीब मुल्ला

ठाणे, 18 – आदिवासी पारधी समाज विकास संस्था, भारतीय लहूजी सेना व भारतीय मराठा महासंघ यांनी मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार नजीब मुल्ला यांना, मुंब्रा-कळवा विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा दिला आहे. आदिवासी पारधी समाज विकास संस्था, भारतीय लहूजी सेना व भारतीय मराठा महासंघ या संस्थांच्या व ते नेतृत्व करत असलेल्या समाजाचे प्रश्न मी सोडविणार असल्याचे जाहीर वचन देत आहे, अशी भावना मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, युवक जिल्हाध्यक्ष विरु वाघमारे, आदिवासी पारधी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष विभिषण काळे, कार्याध्यक्ष मनोहर सुगदरे, भारतीय लहूजी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अंकुश घेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी पारधी समाज हा ३० ते ४० वर्षापासून मुंब्रा कळवा परिसरात रहात आहे पण त्यांच्या विकासाकडे कोणीही लक्ष दिले नाही. गेली १५ वर्पे आमदार असलेल्यानीही त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. कळवा मुंब्रा या भागात छोटे आदिवासी पाडे आहेत त्थांचा पाण्याचा प्रश्न आहे, वीजेचा प्रश्न आहे, फाॅरेस्टचाही त्यांना त्रास आहे, गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मी आदिवासी पाड्यांना भेट देऊन त्यांचे प्रश्न समजावून घेतले. मुलभूत सुविधा देणे ही आमची जबाबदारी आहे. पाणी, वीज हे त्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे आम्ही त्यांना वचन दिले आहे, यामुळे विश्वासाने आदिवासी पारधी समाज विकास संस्थेने मला पाठिंबा दिला आहे. २०११ पासून अण्णाभाऊ साठे स्मारक बनविणे, अण्णाभाऊ, लहूजींच्या जयंतीचे कार्यक्रम सादर करण्यासाठी महापालिकेच्या मार्फत सर्वप्रकारची मदत मिळवून देणे, यासाठी सातत्याने मी प्रयत्नशील राहिलो आहे. याची जाणीव ठेऊन भारतीय लहूजी सेनेने मला पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत आम्हाला असलेला प्रामाणिक जिव्हाळा व मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्याबाबत असलेली आमची वचनबद्धता पाहून भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब आहेर, राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड व प्रदेशाध्यक्ष महेश कदम यांनी मला पाठिंबा जाहिर केला आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल मी आदिवासी पारधी समाज विकास संस्था, भारतीय लहूजी सेना व भारतीय मराठा महासंघ या तिनही संघटनांचा आभारी आहे, असे मत मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले.