Tuesday, March 3 2026 10:50 am

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ दिवाळी फराळ (न्यूट्री दिवाळी) विक्री कार्यक्रम

ठाणे, 8 :- भारत सरकारच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ वर्ष घोषित केले आहे. कोरडवाहू तसेच दुर्गम भागात घेण्यात येणारी पौष्टिक तृणधान्य पिके जसे नाचणी, वरी, ज्वारी, बाजरी, राजगिरा यांचे उत्पादन वाढीबरोबर लोकांचे आहारातील प्रमाण वाढवून त्याच्या औषधी गुणधर्माची माहिती करून देण्यासाठी तसेच आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुषंगाने कोकण विभागात कृषी विभाग व इतर शासकीय विभाग यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पौष्टिक तृणधान्यांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी विभागीय कृषी सहसंचालक, ठाणे कार्यालयामार्फत पौष्टिक दिवाळी फराळ (न्यूट्री दिवाळी) प्रदर्शन व विक्री कार्यक्रम टाऊन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, ठाणे (पश्चिम) येथे दि. ८ व ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या प्रदर्शनात सातारा, नाशिक, नगर, रत्नागिरी अशा अनेक जिल्ह्यातून शेतकरी, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतील पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया उद्योजक, महिला बचतगट सहभागी होणार आहेत. प्रदर्शनामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी इत्यादी पौष्टिक तृणधान्यापासून बनविण्यात आलेले विविध पदार्थ उदा. चकली, चिवडा, शेव, शंकरपाळी तसेच पौष्टिक तृणधान्याचीही विक्री होणार आहे.
हे प्रदर्शन दि. ८ व ९ नोव्हेंबर २०२३ या दोन दिवसांसाठीच मर्यादित असून सर्वांसाठी खुले आहे. तरी पोषणमूल्यांनी समृद्ध, पौष्टिक तृणधान्ययुक्त चविष्ट दिवाळी फराळ खरेदी करून महाराष्ट्र शासन कृषी विभागासोबत आपली दिवाळी आरोग्यदायी बनवूया, असे आवाहन कोकण विभाग, विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.