मुंबई, 31 : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान 202 विशेष रेल्वे गाडया चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दिला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरु होताच पुन्हा एकदा अवघ्या काही मिनिटात बुकिंग फुल्ल झाल्याचे दिसून आले.
आता वाढती मागणी पाहता रेल्वे आणखी गाड्या सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष गाड्यांच्या आरक्षणास 21 जुलैपासून सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी आरक्षण सुरू होताच आठ ते दहा मिनिटातच आरक्षण फुल्ल झाले होते. यावेळी तिकीट आरक्षणात काळाबाजार सुरु आहे का? असा सवाल उपस्थित केला जात होता. आता पुन्हा आरक्षण सुरु झाल्यावर बुकिंग फुल्ल झाले आहे.
258 गणपती स्पेशल ट्रेनचे बुकिंग फुल्ल
गणेशोत्सव म्हणजे कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण. गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. साधारण गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधीपासून कोकणातील मूळगावी जाण्याचे कोकणवासीयांचे नियोजन असते. यंदा गणेशोत्सवास 07 सप्टेंबर रोजी सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवादरम्यान मध्य रेल्वे 202 विशेष गाड्या तर पश्चिम रेल्वेकडून 56 गाड्या सोडण्यात येणार आहे. गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग पुन्हा सुरु झाले होते मात्र अवघ्या पाच मिनिटात 258 गणपती स्पेशल ट्रेनचे बुकिंग फुल्ल झाले आहे. वेटिंग लिस्ट 700 ते 800 च्या घरात पोहोचली आहे.
आणखी गाड्या सोडण्याची शक्यता
दरम्यान, गेल्या वर्षी गणेशोत्सवाची तिकिटे काढताना कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटांतच एक हजारांपार गेली होती. त्यानंतर तिकीट आरक्षणात गैरप्रकार झाल्याची शंका प्रवाशांकडून व्यक्त केली होती. तपासाअंती यात अनेक तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले होते. यंदाही तिकीट आरक्षण काही मिनिटात फुल झाल्याने प्रवासी संतप्त झाले होते. तिकीट आरक्षणात काळाबाजार सुरु आहे का? असा सवाल उपस्थित केला जात होता. तिकीट आरक्षणाची चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा, अशी मागणी आता प्रवासी संघटनांकडून करण्यात आली होती. आता बुकिंग सुरु झाल्यावर अवघ्या पाच मिनिटात कोकण रेल्वे गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. वाढती मागणी पाहता रेल्वे आणखी गाड्या सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
