ठाणे, 21 :- अल्पसंख्यांक विकास विभागांतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृती सन 2024-25 परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृती रिक्त असलेल्या जागी निवडीसाठी सन 2024-25 करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
योजनेच्या अटी व शर्ती:- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी अल्पसंख्याक समुदायातील घटकातील असावा. अर्जासोबत अल्पसंख्यांक असलेबाबत धर्माचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पत्र रु.8 लाखापेक्षा जास्त नसावे. (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडीलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवाराने वडिलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे). परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30% जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील. एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करून देणे बंधनकारक असेल. एका वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत एका कुटुंबातील दोन पाल्यांचा समावेश असल्यास प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरीत जागा रिक्त राहिल्यास एका कुटुंबातील दुसऱ्या पाल्यास लाभ देण्यात येईल. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडीसाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS World University Rank) 200 च्या आत असावी. शासनाने सर्व विभागाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषामध्ये समानता आणण्याकरिता सर्वंकष धोरण ठरविले आहे. त्यामुळे नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार तयार केलेल्या सर्वकष नियमावलीचे सर्व विभागांनी पालन करणे अपेक्षित असल्याने नियोजन विभागाने घेतलेला शासन निर्णय अंतिम असेल. त्यानुषंगाने नमूद करण्यात येते की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (बांधकामे) कार्यासनामार्फत दि.30 ऑक्टोबर 2023 रोजी या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्या संदर्भात दि.9 नोव्हेंबर 2023 रोजी शासन शुध्दीपत्रक निर्गमित केलेले आहे. या योजनेंतर्गत लाभ घेवू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यास पुढील सत्राचा लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून त्यासाठी शैक्षणिक संस्था/विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे.
शासन निर्णय क्र. अविवि 2019/प्र.क्र.211/का-6, दि.23.11.2023 मधील अटी शर्ती लागू राहतील. शासन पुरक पत्र क्र. अविवि 2019/प्र.क्र.211/का-6, दि.20.6.2024 मधील अटी शर्ती लागू राहतील. शासन निर्णय क्र.सान्यावि-2024/प्र.77/बांधकामे, दि.25.7.2024 मधील अटी शर्ती लागू राहतील. शासन निर्णय क्र.अविवि 2019/प्र.क्र.211/का-6, दि.21.08.2024 मधील अटी शर्ती लागू राहतील. अल्पसंख्यांक शासन शुध्दीपत्रक क्र.अविवि 2019/प्र.क्र.211/का-6, वि.20.09.2024 मधील अटी शर्ती लागू राहतील. अटी व शर्ती ह्या सविस्तर जाहिरातीप्रमाणे व शासन निर्णयानुसार लागू राहतील. परिपूर्ण अर्ज व कागदपत्रे सादर करण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील. अपूर्ण कागदपत्र असलेल्या अर्जावर कार्यवाही करता येणार नाही. निवड समितीने अपात्र ठरविलेल्या विद्यार्थ्यांना त्रुटी कळविण्यात येणार नाही.
वेबसाईट वरुन अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.25 फेब्रुवारी 2025 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत ऑनलाईन भरून त्याची प्रिंट, समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावा. महाराष्ट्र शासनाची वेबसाईट https://is-maharashtra.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरावी. तसेच अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या योजनेतील लाभाचे स्वरुप या लिंकवर जाऊन भेट द्यावी.
योजनेतील लाभाचे स्वरुप:- परदेशातील शैक्षणिक संस्थेने ऑफर लेटर मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लास विमान प्रवास भाडे, (परतीच्या प्रवासासह) निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्यांने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मूळ शुल्क भरणा पावती, प्रवासाचे मूळ तिकीट, मूळ बोर्डिंग पास, परतीच्या प्रवासाचे तिकीट इ. तपासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर भारतीय रुपयामध्ये प्रतिपूर्ती केली जाईल.
विद्यार्थ्यांस खालील बाबींवर होणाऱ्या खर्चाचा भार हलका व्हावा, म्हणून दरवर्षी यू.एस.ए. व इतर देशांसाठी (यु.के वगळून) 1500 यु.एस.डॉलर आणि यु.के. साठी 1,100 जी.बी.पी इतका निर्वाह भत्ता/ इतर खर्च आकस्मिक खर्च म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे श्री.ओम प्रकाश बकोरिया यांनी कळविले आहे.
