Monday, December 22 2025 2:55 pm
latest

अमित शाहांनी भिरकावला पहिला दगड

मुंबई-03 : विधानसभा निवडणुका जवळ आल्याने अमित शाह आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र वाऱ्या वाढू लागल्या आहेत. भाजपचे चाणक्य अशी ओळख असणाऱ्या शाह यांनी तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मुंबईत भाजपचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी यांच्या बैठकीत शाह यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी यंदा महायुतीचे अन् २०२९ मध्ये भाजपचे सरकार येणार असे सांगत पहिला दगड भिरकावला आहे. यात कोणाची विकेट पडणार की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपत सामावून घेणार हे पहावे लागणार आहे.
भाजपा हा कायम प्रादेशिक पक्षांबरोबर युती करतो आणि त्यानंतर त्यांना एकतर आपल्या पक्षात सामावून घेतो किंवा वाऱ्यावर सोडतो हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने अमित शाह यांचे वक्तव्य नवे नाही. पण राज्यात भाजपाबरोबर युती केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा असू शकते. लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त ९ जागा मिळाल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना डोईजड होऊ नये याची चर्चा राज्यासह दिल्लीत सुरू आहे. कोणत्याही प्रकारे शिंदे यांचे पंख कापायचे अशी तयारी भाजपने सुरू केली आहे. दुसरीकडे अजित पवार यांचे सत्तेत असणे संघ परिवार यांना मान्य नाही. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी अशीही भाजपची अपेक्षा आहे.

येत्या काही दिवसात याबाबतचे चित्र समोर येईल. पण भाजपला एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्याबरोबर सतत युती करून सरकार बनवायचे नाही. मग पर्याय उरतो तो या दोन्ही पक्षांनी भाजपत सामील व्हावे हा. यासाठीच अमित शाह यांनी हे वक्तव्य केले आहे. शिंदे आणि पवार यांनी भाजपामध्ये सामील व्हावे अशी मानसिकता तयार करण्यासाठीच शाह यांनी हा दगड भिरकावला आहे. हे दोन्ही पक्ष भाजपमध्ये सामील झाले नाही तर ईडी आणि सीबीआय ही हत्यारे भाजपकडे आहेतच.