Monday, December 22 2025 2:45 am
latest

अन्न व औषध प्रशासनाच्या सुसज्ज इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर 12 : अन्न व औषध प्रशासनाच्या सिव्हील लाईन येथील सुसज्ज इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. खाद्य पदार्थातील भेसळ शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळा व अत्याधुनिक यंत्र सामुग्री आदी सुविधा येथे उपलब्ध झाल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग सचिव धीरज कुमार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्रीधर डुबे -पाटील, नागपूरचे सह आयुक्त कृष्णा जयपुरकर, मिलिंद काळेश्वरकर आदी यावेळी उपस्थित होते.

अन्न व औषध प्रशासन, नागपूर विभागीय कार्यालयाची नूतन इमारत पाच मजली आहे. इमारतीचे बांधकाम 1 हजार 500 चौरस मीटर आहे. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर औषध विभाग व दुसऱ्या माळ्यावर अन्न विभाग कार्यान्वित होणार आहेत. इमारतीमध्ये अत्याधुनिक उपकरणे असलेली प्रयोगशाळा उर्वरित जागेत असेल. या इमारतीच्या बांधकामासाठी 15 कोटी 17 लाख रुपये खर्च झाले आहेत.

नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे अन्नपदार्थांची वाहतूक व वितरण येथून मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अन्नपदार्थ साठविण्यासाठी शीतगृहे, वेअर हाऊस लॉजिस्टिक पार्क येथे मोठ्या प्रमाणात आहेत. नागरिकांना सुरक्षित पदार्थ उपलब्ध होण्यासाठी तसेच औषधे व खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषधी नमुन्यांची दर्जात्मक व गुणात्मक विश्लेषण करणे ही महत्त्वाची बाब आहे.

या प्रयोगशाळेत अद्ययावत यंत्र सामग्री व उपकरणे प्राप्त झाल्यामुळे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावी व गतिमान होण्यास मदत होणार आहे.

यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे चंद्रपूरचे सहाय्यक आयुक्त प्रवीण उमप, सुहास सावंत, गडचिरोलीचे गिरीश सातकर, वर्धेचे प्रफुल्ल टोपले, नीरज लोहकरे तसेच नागपूरचे रोहन शहा, अभय देशपांडे, मनीष चौधरी तसेच विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार रेणुका देशकर यांनी मानले.