दंड वसुली आणि गुन्हा दाखल करणे याचा सहाय्यक आयुक्तांनी आढावा घ्यावा
ठाणे 05 : ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्याची मोहीम दररोज राबवण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर, नोटीसा देणे, दंड वसुली आणि गुन्हा दाखल करणे याचा सहाय्यक आयुक्तांनी दैनंदिन आढावा घ्यावा, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका क्षेत्राचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत, मा. उच्च न्यायालयाचे अतिशय काटेकोर आदेश आहेत. त्याचे पालन सगळ्यांनी करावे. अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस, दंड आकारणी आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असे आयुक्त राव म्हणाले.
ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी सायंकाळी सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख, कार्यकारी अभियंता यांची आढावा बैठक घेतली. त्यास, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी यावेळी विविध विभागांकडील कामांचा आढावा घेणारे सादरीकरण केले.
जानेवारी महिन्यात वृक्ष छाटणीचा पहिला टप्पा
दरवर्षी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी केल्या जाणाऱ्या वृक्ष छाटणीबाबत तक्रारी येतात. त्यामुळे आयुक्त राव यांनी ही वृक्ष छाटणी दोन टप्प्यात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, उद्यान विभागाने नियोजन केले आहे. जानेवारी महिन्यापासून झाडांच्या वाढलेल्या आणि धोकादायक स्थितीतील फांद्या, धोकादायक वृक्ष यांची पाहणी करून त्यांच्या छाटणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम वेळेत सुरू करण्याची सूचना आयुक्त राव यांनी बैठकीत दिली.
शाडूच्या मूर्ती किफायतशीर दरात मिळाव्यात म्हणून प्रयत्न करावा
ठाणे महापालिका क्षेत्रात, सन २०२४च्या गणेशोत्सवात सुमारे ३० टक्के मूर्ती या शाडूच्या होत्या. हे प्रमाण पुढील वर्षी वाढवण्यासाठी पर्यावरण विभागाने सहा महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.
सन २०२५च्या गणेशोत्सवात ठाणेकरांचा शाडूच्या मूर्तींकडील कल वाढावा यासाठी त्या मूर्ती किफायतशीर कशा होतील, यासाठी प्रयत्न करावेत. मूर्तीकार, गणेश मंडळे, पर्यावरण विषयातील संस्था यांच्या मदतीने याबाबत जनजागृती करण्यात यावी. मूर्तीकारांशी संवाद साधून त्यांना शाडूची माती आणि कार्यशाळेसाठी जागा आगाऊ उपलब्ध करून द्यावी, असेही आयुक्तांनी सांगितले.
रस्तोरस्ती लागणाऱ्या मूर्ती विक्री केंद्रांऐवजी केंद्रीत पध्दतीने, ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांमध्ये, मैदानात स्टॉलची व्यवस्था करावी, म्हणजे रस्ते वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा येणार नाही, याची दक्षता सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभागात घ्यावी, असे आयुक्त म्हणाले.
