Monday, December 22 2025 4:57 am
latest

अतिक्रमण विरोधी पथकाने ठाणे महापालिका क्षेत्रातील १२४ अनधिकृत बांधकामांवर केली कारवाई

शीळ येथील १८ अनधिकृत इमारती पाडल्या
अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई नियमितपणे सुरू

ठाणे 03 : मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या १२४ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. १९ जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शीळ येथील एम के कम्पाऊंडमधील १८ इमारतींच्या पाडकमांचाही समावेश आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात, १९ जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. त्यासाठी नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे.

प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर, अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार आल्यास त्याची शाहनिशा करून ते बांधकामेही तोडण्यात येत आहे. या बांधकामांमध्ये वाढीव बांधकामांचा समावेश अधिक असल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे यांनी दिली.

महापालिका क्षेत्रात अनधिकत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, आरसीसी इमारतीचे बांधकाम, अनधिकृत बंगले, नाल्यालगतचे बांधकाम, आरक्षित भूखंडावरील गोडावूनचे बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे. हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावरही कारवाई सुरू आहे. तसेच, खाडी किनारा, अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली.

दरम्यान, शीळ येथील एम. के. कम्पाऊंड येथे मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण २१ इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे. त्यापैकी १८ इमारती पाडण्यात आल्या आहेत. उर्वरित इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे. परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, सचिन सांगळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेची अमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरुपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत. अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये उपायुक्त (परिमंडळ), सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅ्क्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येत आहे. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे.

कारवाईच्या आकडेवारीचा तक्ता
(१९ जून ते ०३ जुलैपर्यंतची आकडेवारी)
नौपाडा-कोपरी – १०
दिवा – २८
मुंब्रा – १५
कळवा – १२
उथळसर – ११
माजिवडा-मानपाडा – २०
वर्तक नगर – १४
लोकमान्य नगर – १०
वागळे इस्टेट – ०४
एकूण – १२४