Thursday, November 13 2025 11:33 am

राज्यात श्वान दत्तक योजना सुरू करणार – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 3 : शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे. श्वानांचे संगोपन करण्यासाठी राज्यात श्वान दत्तक योजना सुरु करणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य सर्वश्री प्रताप सरनाईक, अतुल भातखळकर, सुनील टिंगरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्यांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, प्राणी प्रेमी किंवा दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला दत्तक योजनेच्या माध्यमातून श्वान दत्तक दिले जाईल. याबाबत विहीत धोरण ठरविण्यासाठी एक समिती गठित करण्यात येईल. समितीत या विषयाबाबत काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचाही सहभाग करून घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले.