Thursday, November 13 2025 11:13 am

पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक,04 : जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी दिंडोरी तालुक्यातील जानोरी, कोरटे परिसराला भेट देत सततच्या पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी नानाजी भोये, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले की, सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशा वेळेस राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पिकांच्या नुकसानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतक-यांच्या खाती जमा करण्यात आली आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत. लवकरच नुकसानीचा अहवाल प्राप्त होणार असून सदरचा अहवाल तातडीने शासनास सादर करण्यात येईल. यावेळी शेतकरी रामराव दवणे, लक्ष्मीबाई कदम यांनी शेत पिकांच्या झालेल्या नुकसानाची माहिती मंत्री महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांना दिली.