Saturday, March 7 2026 8:59 am

जीवनशैली बदला, अनुवंशिक आजारांना रोखा! – डॉ. कौमुदी गोडबोले यांनी सुचवला रामबाण उपाय

ठाणे 12 : आपण जनुके बदलु शकत नाही पण, आपली जीवनशैली बदलु शकतो. जोवर आपण जीवनशैलीत बदल करीत नाही, तोवर आजार आपला पाठलाग सोडणार नाहीत. अनुवांशिकतेच्या रुपात हेच आजार पुढच्या पिढीला मिळतील. त्यामुळे जीवनशैली बदला, आजार रोखा, असा रामबाण उपाय पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रख्यात वैद्यकीय अनुवंश शास्त्रज्ञ डॉ. कौमुदी गोडबोले यांनी सुचवला.

ठाण्याच्या नौपाडा येथील सरस्वती क्रिडा संकुलाच्या मैदानात आमदार संजय केळकर आयोजित ४० व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे “अनुवंशकितेतून येणारे आजार व उपाय” या विषयावरील दुसरे पुष्प शुक्रवारी डॉ. कौमुदी गोडबोले यांनी गुंफले. या प्रसंगी, व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष डॉ. अमोल गिते आणि सुहास जावडेकर उपस्थित होते. तर, श्रोत्यांमध्ये व्याख्यानमाला समितीच्या माधुरी ताम्हाणे, माजी उपमहापौर सुभाष काळे, टीजेएसबी बँकेचे माजी अध्यक्ष विद्याधर वैशंपायन, विजय जोशी आदीसह अनेक नागरीक उपस्थित होते.

एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित होणारे अनुवंशिक आजार व त्यावरील उपाय डॉ. कौमुदी गोडबोले यांनी सुलभ भाषेत विषद केले. अनुवंशिक आजार आपल्या डीएनएमधील घटकांमुळे होत असतात. काही जैविक बदलांमुळे या जनुकांमध्ये परिवर्तन घडून येत असते. हे परिवर्तन (म्यूटेशन) एका जनुकांमध्ये किंवा संपूर्ण गुणसूत्रांमध्ये देखील होऊ शकते. आजार नुसते बघुन ओळखता येत नाहीत, तसेच प्रत्येक आजाराचे जनुक देखील आपल्याला माहिती असतेच असेही नाही. सोनोग्राफी ही केवळ फोटोग्राफी आहे, अशावेळी जनुकीय चाचण्या महत्वपुर्ण ठरतात. तरीही जेनेटीक चाचण्या सरधोपटपणे केल्या जात नाहीत, त्यासाठी संबंधितांची पूर्वपरवानगी आवश्यक असते, असे डॉ. गोडबोले यांनी नमूद केले.

जनुकीय बदलामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, अल्जायमर, कॅन्सर, स्थूलता, गाठी होणे यांसारखे तसेच, हिमोफेलिया, थॅलेसिमियासारखे आजार होऊ शकतात. बहुतांश आजारांपैकी ८० आजार हे अनुवंशिकतेशी निगडीत आहेत. बाळाच्या जन्मापूर्वीच त्याच्या आईची जीनोम सीक्वेंन्सिंग करावी, असा सल्ला देताना त्यांनी, योग्य वेळी योग्य निदान आणि खबरदारी घेतली तर अनुवंशिक आजारांवर मात करता येऊ शकेल, असेही सांगितले.

‘जनुकीय क्षेत्रात देशात आवश्यक संशोधन झाले नसल्याने ही निदान पद्धती सामान्यांसाठी अतीखर्चिक ठरत आहे. म्हणुन आपण आपली जनुकं बदलु शकत नसलो तरी जीवनशैली बदलुन प्रतिबंध करणे सुलभ असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ह्या क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन करुन ही निदान पद्धत सामान्यांच्या आवाक्यात यावी या दिशेने पावले उचलण्याची गरज आहे. किंबहुना, भारतात या प्रकारचे संशोधन होईल तेव्हाच, जेनेटीक आजारांवर मात करता येईल. याकरिता जेनेटीक डॉक्टरांची सोसायटी काम करीत असल्याचे सांगुन, या संदर्भातील विस्तृत माहिती हवी असल्यास “जनांसाठी जेनेटीक” या पुस्तकात ऑनलाईन पाहता येईल असे स्पष्ट केले.