Thursday, November 13 2025 10:31 am

जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्च स्तरीय समिती -गुलाबराव पाटील

जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्चस्तरीय चौकशी – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, 20 : बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य नमिता मुंदडा यांनी बीड जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांमध्ये झालेल्या तक्रारीबाबत बीड जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानुसार उपायुक्त विकास यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती गठित करून विभागीय आयुक्तालयामार्फत चौकशी करण्यात आलेली आहे. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संदीप क्षीरसागर, लक्ष्मण पवार, धनंजय मुंडे यांनी सहभाग घेतला.