Wednesday, November 12 2025 4:06 pm

घरगुती गणेशमुर्त्या शाडूच्याच असाव्यात : महापालिकेचा आग्रह

महापालिकेने घेतली गणेशमूर्तीकारांची बैठक

ठाणे 22 : भाद्रपद गणेशोत्सवाला अजून बराच अवधी असला तरी गणपतीच्या मूर्ती बनविण्याआधीच महापालिकेने आज मूर्तीकाराची बैठक घेवून यावर्षी घरगुती गणेशाच्या मूर्ती या शाडूच्याच बनविण्यात याव्यात. यासाठी लागणारी शाडूमाती, जागा आणि इतर सुविधा महापालिका उपलब्ध करुन देईल अशी ठोस भूमिका महापालिकेने घेतली आहे. तसेच मूर्तीकारांच्या उर्वरित मागण्यांबाबतही सकारात्मक विचार करुन सुवर्णमध्य काढण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांनी नमूद केले.

ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आज (22 फेब्रुवारी) मूर्तीकारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस उपायुक्त वर्षा दिक्षीत, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान तसेच ठाण्यातील बहुसंख्य मूर्तीकार उपस्थित होते.

शाडूमातीच्या मुर्त्या या पर्यावरणपूरक असल्यामुळे यंदा घरगुती गणेशाची मूर्ती ही शाडूची असेल याची दक्षता मूर्तीकारांनी घ्यावयाची आहे. तसेच गणेशमूर्ती साठवणूक करण्यासाठी तसेच मूर्ती बनविण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेकडे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे मुर्तीकारांना शाडूची माती देखील उपलब्ध करुन दिली जाणार आहे. मूर्तीकार किती मूर्ती घडविणार आहेत, किती साठा करणार आहेत याची सर्व माहिती महापालिकेस देणे बंधनकारक असणार आहे. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी यासाठी कारखानदारांनी कारखान्यात फलक लावावा. प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक असलेल्या गणेशमूर्ती बनविण्याबाबतचे आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांनी यावेळी केले.

शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी बराच कालावधी लागतो, यासाठी मूर्तीकारांना महापालिकेच्या पडीक किंवा मोकळ्या जागा 12 महिन्यांसाठी उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच जे अधिकृत मूर्तीकार आहेत त्यांना महापालिकेने ओळखपत्र द्यावे. बाहेरच्या मूर्तीकारांना जिल्हाबंदी करण्यात यावी. तसेच जे मूर्तीकार बाहेरून मुर्ती आणून त्याची विक्री करतात त्यांना देखील परवानगी बंधनकारक करावी. जे मूर्तीकार शाडू माती ऐवजी पीओपीच्या मूर्ती तयार करतात त्यांच्यावर निर्बंध आणावेत. शाडूच्या मूर्तीबाबत महापालिकेने नियमावली प्रसिद्ध करावी जेणेकरुन मूर्तीकारांना ती कारखान्यात लावणे बंधनकारक करावे अशा मागण्या बैठकीस उपस्थित असलेल्या मूर्तीकारांनी केल्या.

शाडूच्या मूर्तीबाबत मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने घंटागाड्या, उद्याने, मैदाने तसेच शहरातील विविध भागात जनजागृती करणारे फलक आतापासूनच लावावेत अशीही सूचना यावेळी मूर्तीकारांकडून करण्यात आली.

सदर बैठकीत प्रशासनाकडे मूर्तीकारांनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन तोडगा काढला जाईल असेही मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले.