Friday, May 14 2021 12:24 pm
ताजी बातमी

हॉस्पिटलमधील ऑक्सीजन, विद्युत पुरवठा तसेच अग्नि सुरक्षा नियंत्रणासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक

ठाणे :  कोविड हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारे दुर्घटना घडू नये तसेच हॉस्पिटलमधील ऑक्सीजन पुरवठा, विद्युत पुरवठा, तसेच अग्निशमन सुरक्षा सुरळीत कार्यरत राहण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक कऱण्यात आली सून या अधिकऱ्यांनी नियमित अहवाल देण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.

कोविड -१९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता, कोविड हॉस्पिटलवर ऑक्सीजन पुरवठ्यासाठी मोठया प्रमाणावर ताण पडत आहे. नाशिक येथे कोविड -१९ हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन पुरवठयाचे वेळी झालेली दुर्घटना विचारात घेता, अशा प्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सीजन पुरवठा सुविधा, विद्युत पुरवठा सुरक्षा, तसेच अग्निशमन सुरक्षा सुरळीत कार्यरत राहण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक कऱण्यात आली आहे.

ठाणे शहरातील महानगरपालिकेच्या जंबो कोविड सेंटर मधील ऑक्सीजन साठयावर, तेथील ऑक्सीजन व्यवस्थेवर, ऑक्सीजन वितरण व्यवस्थेवर देखरेख ठेवणे, शहरातील खाजगी रुग्णालयांतील ऑक्सीजन साठा व वितरण प्रणाली तपासणे आदी कामांसाठी बायोमेडीकल इंजिनियर मंदार महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये विद्युत पुरवठा संदर्भातील कामकाज पाहण्यासाठी उप नगर अभियंता विनोद गुप्ता यांची नियुक्ती कऱण्यात आली असून हॉस्पिलमधील अग्निशमन यंत्रणेच्या नियंत्रणासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झलके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.