Friday, May 14 2021 1:31 pm
ताजी बातमी

शिक्षकांना विमा संरक्षण द्या; योग्य सुविधा पुरवाआ. संजय केळकर आणि शिक्षक परिषदेची मागणी

ठाणे : कोविड लाटेला तोंड देण्यासाठी शिक्षकांना विविध केंद्रांमध्ये आरोग्य सेवकांच्या मदतीसाठी पाठवले जात असून अशा कोविड संकटात काम करणा-यांना पीपीई कीट्स आणि अन्य साहित्य देण्यात टाळाटाळ करु नये तसेच शिक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना इतर आरोग्य सेवकांप्रमाणे ५० लाखांचा संरक्षण विमा द्यावा, अशी सूचना आणि मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

कोविडची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आली असून शिक्षकांना विविध आरोग्य केंद्रांवर आणि घरोघरी आरोग्य तपासणीसाठी पाठवले जात आहे. त्यांच्या आरोग्याची आवश्यक काळजी घेणे जरुरीचे आहे. मागील वेळी त्यांना कामगिरी दिली, पण शासनाने अक्षरश: वा-यावर सोडले. विमा संरक्षण तर नाहीच दिले पण आरोग्य सेवेचे काम करत असताना आवश्यक साहित्यही पुरवले नाही, त्यामुळे अनेक शिक्षक आणि त्यांची कुटुंबे कोरोनाग्रस्त झाल्याचे आ. संजय केळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

शासनाने फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून त्यांचा अंतर्भाव करुन आरोग्यसेवकांप्रमाणे सवलती आणि सुविधा द्याव्यात, अशी मागणी आ. संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.