Friday, June 18 2021 4:27 pm

वादग्रस्त फायलींना फुटले पाय…वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बॅकडेटेड मंजूरी?भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा आरोप

ठाणे : शहर विकास विभागातील महत्वाच्या व वादग्रस्त प्रस्तावांबाबतच्या फाईल्स बेकायदेशीर पद्धतीने कार्यालयाबाहेर नेल्या जात आहेत. एका अतिवरिष्ठ माजी अधिकाऱ्याकडून बॅकडेटेड मंजूरी दिली जात आहे, असा खळबळजनक आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. या संदर्भात श्री. पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पत्र पाठवून या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.
महापालिकेचा शहर विकास विभाग नेहमी वादग्रस्त राहिला आहे. या विभागातील अनेक फाईल्सची मंत्रालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व सीआयडीकडून चौकशी सुरू असून, न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यापूर्वी शहर विकास विभागात आग लागून वादग्रस्त फाईल्स जाळल्या जाण्याची भीती ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर एक अतिवरिष्ठ अधिकारी बदलीपूर्व रजेवर गेल्यानंतर महापालिका मुख्यालयातून २००-३०० फाईल्स एकत्रितपणे बाहेर नेल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर काही महिन्यांतच शहर विकास विभागात आग लागल्याची घटना घडली होती, याकडे श्री. पवार यांनी लक्ष वेधले आहे.
महापालिकेच्या एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे व वादग्रस्त प्रस्ताव तयार करण्याची सुचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, त्यावर त्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षऱ्या झाल्या नव्हत्या. आता त्याच फाईल्स मंजूर करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामागे काही ठराविक अधिकारी व काही बिल्डरांचे संगनमत आहे. त्यांच्याकडून अनेक वादग्रस्त प्रकल्पांच्या फाईल्स शहर विकास कार्यालयाबाहेर नेऊन त्यावर संबंधित अधिकाऱ्याच्या बॅक डेटेड स्वाक्षऱ्या केले जात आहेत, असा आरोप श्री. नारायण पवार यांनी केला. तसेच शहर विकास विभागातून बाहेर नेल्या जाणाऱ्या फाईल्स व सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही माहिती घेतल्यास उलगडा होऊ शकेल. त्याचबरोबर या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून वादग्रस्त प्रस्तावांवरील फाईल्सचा शोध घेण्याची मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.