Friday, May 14 2021 12:18 pm
ताजी बातमी

लातूरमध्ये १२८ गावरान कोंबड्यांचा मृत्यू

लातूर :अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी गावात कोंबड्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. कोंबड्यांना न्यूमोनिया झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी इथे १२८ गावरान कोंबड्या दगावल्या आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

केंद्रवाडी येथील सदाशिव केंद्रे या शेतकऱ्याने दोन महिन्यापूर्वी अहमदनगर येथून ५०० कोंबड्याची पिले आणली होती. मात्र काल सकाळपासून त्यांनी पाळलेली कोंबड्याची पिले अचानक दगावू लागली. कोंबड्याची पिले अचानक दगावल्याची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

अत्यंत कमी जागेत जवळपास ५००हुन अधिक कोंबड्या होत्या. त्यात थंडीचा कडाका वाढल्यामुळे कोंबड्याना न्यूमोनिया झाल्याचा प्राथमिक अंदाज उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाहणीनंतर व्यक्त केलाय. दरम्यान मृत कोंबड्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे.

एकीकडे बर्ड फ्लूचा धोका देशात वाढत असताना अशा प्रकारे कोंबड्यांच्या मृत्यूने चिंता आणखी वाढल्या आहेत..