Friday, May 14 2021 12:23 pm
ताजी बातमी

राष्ट्रवादीतून भाजप मध्ये गेलेल्या ‘त्या’ नेत्याच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना प्रयत्नात, मात्र कॉंग्रेसने घेतली ‘ही’ आक्रमक भूमिका

नवी मुंबई : महापालिका निवडणूक झाली नसली तरी ती निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. कारण राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत नवी मुंबईचे दिग्गज नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे आता भाजपचं पारडं जड झाले आहे. मात्र गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. पण या दरम्यान काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या निवडणुकीत काँग्रेस स्वबळाची भूमिका घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी मुंबईप्रमाणे राज्यभरातील महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा मानस यावेळी काँग्रेस नेते नसीम खान यांच्याकडून करण्यात आला. आजपासून काँग्रेस नवी मुंबईतील सर्व 111 प्रभागात स्वबळावर काम करणार आहे असे नसीम खान यांनी स्पष्ट केले आहे. नसीम खान यांच्या या वक्तव्याने आगामी मनपा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नवी मुंबई महापालिका निवडणुकीत सर्व 111 प्रभागात काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे असा संकल्प करण्यात आला.

नवी मुंबई निवडणुकीत गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला
2019च्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. नाईक यांचा पक्ष सोडून जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या खूप जिव्हारी लागला होता. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तसेच राष्ट्रवादीचे आमदार आणि माथाडी कामगारांचे नेते अशी ओळख असलेले शशिकांत शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून शहरात तळ ठोकून आहेत. तसेच गणेश नाईक यांनीसुद्धा आपला बालेकिल्ला राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. शिवसेनेकडूनसुद्धा आपले वर्चस्व राखण्यासाठी ताकद पणाला लावण्यात येत आहे. त्यामुळे ही निवडणूक खूप रंगतदार होणार यामध्ये काही वादच नाही.