Wednesday, December 1 2021 6:06 am
latest

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

महाराष्ट्र : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत होणार आहे.कमी कालावधीसाठी अधिवेशन होत असल्याने विरोधक नाराज झाले आहेत. विरोधकांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग केला आहे. या सरकारला चर्चेपासून पळ काढायचा असल्याने अधिवेशन कमी कालावधीसाठी ठेवण्यात आल्याचं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मंत्री गर्दी करतात तिथे कोरोनाचे भय नाही, इथे कोरोनाचे कारण देता. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं घ्यायचं या विवंचनेत राज्य सरकार होतं. त्यामुळेच साधारणतः महिनाभर चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन १० दिवस चालणार आहे.

आजपार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीबाबत निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे यापूर्वीचे पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन कमी कालावधीत गुंडाळण्यात आले होते. किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण काळ चालेल अशी शक्यता होती. मात्र फेब्रुवारी महिना उजाडला आणि पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला. त्यामुळेच राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं चालवायचं याची चिंता सरकार समोर होती.

कोरोनामुळे अधिवेशनात विशेष काळजीही घेतली जाणार आहे. आमदारांची सोशल डिस्टंसिंग राखत सभागृहात बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसंच काही आमदारांची बसण्याची व्यवस्था प्रेक्षक आणि अधिकार गॅलरीत करण्यात येणार आहे.अधिवेशनापूर्वी मंत्री, आमदार, तसंच अधिवेशनासाठी येणार्‍या कर्मचारी, अधिकारी आणि पत्रकारांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी अभ्यागत आणि आमदारांच्या पीएना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाही. अशी सर्व काळजी घेऊन राज्य सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पाडणार आहे.