Friday, June 18 2021 4:52 pm

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस

मुंबई : महानगर क्षेत्रासह कोकणात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत सकाळी सहानंतर पाऊस थांबला आहे. दरम्यान, ठाणे, नवी मुंबईत मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, आजपासून राज्यातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, बदलापूर, पालघर, जोगेश्वरी, अंधेरी, कांदवली, बोरवली, नालासोपारा, वसई याठिकाणी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. तर कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. पुढील तीन दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

कोणीही समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. आजपासून चार दिवसांच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क ठेवा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्याण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.