Friday, May 14 2021 12:39 pm
ताजी बातमी

मांजरपाडा प्रकल्पाचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी वळण योजनेद्वारे गोदावरी खोऱ्यात वळवणार – पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक : मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असून यंदाच्या पावसाळ्यात येवला, चांदवडला पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून भविष्यात मराठवाड्यासह महाराष्ट्राची तहान भविण्यासाठी  हा प्रकल्प अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

दिंडोरी येथील मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाच्या सुरु असलेल्या  कामांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेचे उपाध्यक्ष  नरहरी झिरवाळ यांच्यासमवेत पाहणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता विश्वास दराडे, प्रांत अधिकारी संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

या अगोदरच मांजरपाडा प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. दायित्वाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्य धरणाचे अपूर्ण असलेले काम  हे काम गेल्या महिनाभरापूर्वी सुरु करण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाचे काम ८७ टक्क्यांपेक्षा अधिक काम झाले असून मे २०२१ अखेर पर्यंत या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे. काम सुरू झाल्यापासून १५ मीटर उंचीचे धरणाचे बांधकाम झाले असून आता केवळ १४ मीटर धरणाचे बांधकाम शिल्लक राहिले आहे. त्याचबरोबर धरणाचे मातीकाम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मांजरपाडा (देवसाने) मुख्य धरणाच्या सांडव्याची घळभरणी सुरू असून हे काम १५ मे पर्यंत करण्याचे नियोजन असल्याने जलद गतीने काम करण्यात येत आहे.

त्याचबरोबर या भागातील देवसाने ते गोगूळ हा रस्ता काही कालावधीसाठी बंद करण्यात आला आहे. देवसाने हे गाव दिंडोरी तालूक्यात असून ते पक्क्या डांबरी सडकेने दिंडोरीला जोडलेले आहे. गोगूळ हे सुरगाणा तालुक्यातील डांगराळे भागातील गाव  आहे. घळभरणी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गावे पुन:श्च धरणमाथ्यावरील रस्त्याद्वारे एकमेकांशी जोडले जाणार आहे. या रस्त्यावर एकूण ३३ गर्डर बसविण्यात येणार असून त्यापैकी २६ गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. तर इतर गर्डर बसवण्याचे काम सुरु  आहे. सर्व कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मांजरपाडा धरणाच्या कामासोबतच कॅनॉल व त्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे काम देखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात करण्यात येणार आहे. येवला तालुक्यातील डोंगरगावपर्यंत हे पाणी पोहचणार आहे. सन २०१९ पासून मुख्य वळण बोगद्याद्वारे पार नदीचे पाणी अंशत: वळविण्यास सुरुवात झाली आहे. धरणाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण झाल्यावर पाणी पूर्ण क्षमतेने गोदावरी खोऱ्यात वळविले जाणार असून येत्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने येवला व चांदवड तालुक्याला पाणी उपलब्ध होणार आहे. 

वणी कोविड केअर सेंटरची केली पाहणी

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज अचानकपणे पालकमंत्री छगन भुजबळ व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वणी गावातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी रूग्णांना वेळेवर औषधे जेवण यासह आवश्यक सुविधा मिळतात की नाही याबाबत रुग्णांची चौकशी केली. यानंतर पालकमंत्री यांनी वणी येथील कृष्णा हायस्पीड सिटी स्कॅन सेंटरलाही भेट दिली.